Sun. Jan 5th, 2025

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

बुधवार २८ ऑगस्ट रोजी वरळी येथील डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाऊंडेशनतर्फे इको फ्रेंडली गणेश चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सलमान खानने गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा उपस्थितांना आग्रह केला. पृथ्वी अनुकूल होण्याचे धडे आता सगळ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे. या वर्षी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी टेराकोटा किंवा इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूया. असेही सलमान खानने सांगितले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दिव्याज फाउंडेशनने छात्र संसद इंडिया,  बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने “बच्चे बोले मोरया” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा  कार्यक्रम केवळ गणपतीचा उत्सव नव्हे तर शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पर्यावरण संवर्धन आणि त्यासाठी सामुदायिक सहभागावर लक्ष केंद्रित करून मुंबईचा लाडका गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा? यासाठी काय बदल करावा? हे या उपक्रमाच्या माध्यमातून समोर आणण्यात आले.

दिव्याज फाऊंडेशन आणि ‘बच्चे बोले मोरया’ कार्यक्रमाची संकल्पना अमृता फडणवीस यांची आहे. तरुण पिढीला पर्यावरणाचे महत्व सांगून पर्यावरण रक्षणाची शाश्वत पद्धती अंगीकारण्यासाठीची प्रेरणा या कार्यक्रमातून अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

जैवविघटन न होणाऱ्या मूर्तींच्या विसर्जनामुळे अनेकदा पर्यावरणीय आव्हाने उभी राहिली आहेत. ही समस्या ओळखून, दिव्याज फाऊंडेशनने “बच्चे बोले मोरया” उपक्रमातून तरुण पिढीला शाश्वत गणेशमूर्तींच्या निर्मितीपासून पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले आहे. अर्थपूर्ण बदलाची सुरुवात मुलांपासून होते, त्यामुळे मुलांपासूनच या उपक्रमाची सुरुवात करणे आवश्यक आहे. ही मुलेच उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांनी पर्यावरण रक्षणाचे धडे घेतले तर भविष्यात पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते हा यामागचा उद्देश्य आहे.

कार्यक्रमादरम्यान, मुंबईतील मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी नैसर्गिक, जैवविघटनशील पदार्थांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रदर्शन केले. हे एक प्रकारे पर्यावरण संरक्षणातील मुलांच्या भूमिकेचे प्रतीक आहे. तसेच तरुणांमध्येही सर्जनशीलता, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढवण्यावरही या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे.

हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे उत्सवच होता, यात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन सांस्कृतिक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात गायक सोनू निगम आणि कैलाश खेर यांनी त्यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांचे मनोरंजनही केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी मुलांच्या प्रयत्नांना या दोघांनी त्यांच्या कलेने एक प्रकारे प्रोत्साहित केले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी मनपा आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, धर्मादाय आयुक्त राम अनंत लिपटे, मुख्य सचिव प्रवीण दराडे, अभय भुटाडा  फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय भुटाडा, पूर्व उपनगराचे सहाय्यक मनपा आयुक्त पर्यावरणतज्ञ डॉ. अमित सैनी, सोनाली बेंद्रे, डोम एंटरटेनमेंटचे एमडी मजहर नाडियादवाला, लोढा फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मंजु लोढा, बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुठा उपस्थित होते.

बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी शाश्वत भविष्य घडवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व कसे आहे हे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आमच्या मुलांपासून सुरुवात करून, आम्ही जागरूकता आणि जबाबदारीची बीजे रोवली आहेत, जी आपल्या पृथ्वीमातेबद्दल आदर वाढवणारी आहेत. प्रत्येक लहान कृती महत्त्वाची असते आणि ते विचारपूर्वक आपण निवडू शकतो हे मुलांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. पृथ्वीचे रक्षण आम्ही करू शकतो हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा आणि त्यासाठी त्यांना तयार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश्य आहे असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.‘बच्चे बोले मोरया’ हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यापुरताच नव्हता तर गणेशचतुर्थीच्या उत्सवात पर्यावरणाचा आणि परंपरांचा ऱ्हास होणार नाही याची खात्री करण्यासाठी आहे. धोरणात्मक भागीदारी, सर्वसमावेशक मोहिमा आणि एकत्र समुदाय सहभागाद्वारे पर्यावरणपूरक उत्सवांसाठी एक नवीन मानक स्थापित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांचे सहकार्य आणि शाळा, सरकारी संस्था आणि नामवंत व्यक्तींच्या सक्रिय सहभागाने या उपक्रमाच्या माध्यमातून बदल घडवून आणता येईल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच अधोरेखित झाले.

या पर्यावरणपूरक उत्सवाचे नेतृत्व मुंबईच्या मुलांनी केले, “बच्चे बोले मोरया” हे भविष्यासाठी पृथ्वीचे रक्षण करताना सांस्कृतिक वारशाचे जतन करून, काळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परंपरा कशा विकसित होऊ शकतात याचे एक सशक्त उदाहरण म्हणता येईल.

बच्चे बोले मोरया आणि #MiKachraKarnarNahi मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी, अमृता फडणवीस आणि दिव्यज फाउंडेशनने बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त मुंबईकरांनी भाग घ्यावा असे आवाहनही अमृता फडणवीस यांनी यावेळी केले.

    

पृथ्वी संवर्धनासाठी अमृता फडणवीस यांच्यातर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश चळवळीला सलमान खानचा पाठिंबा, डोम एसव्हीपी स्टेडियमवर झाला कार्यक्रमाचा शुभारंभ

By admin